शिव स्पंदन : प्रतिनिधि :
रांजणगाव गणपती मंदिरासमोर उभी असलेल्या एका ट्रॅव्हल बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेच्या वेळी परिसरात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आणि मंदिर परिसरातील भाविकांनी तत्काळ सुरक्षित अंतर ठेवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये त्या वेळी प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, बसच्या इंजिनमधील बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे काही काळ मंदिर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

