शिव स्पंदन : प्रतिनिधि :
शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींविरोधात सलग दोन दिवसांत धडाकेबाज कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी बनावटीची पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकूण सुमारे ३,४५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरूर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार विशाल कोथळकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे निमोणे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील नागेश्वर विद्यालयासमोर पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार (MH 12 HL 3114) उभी असून त्यामध्ये दोन इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगून थांबलेले आहेत.
ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, पोलीस हवालदार विशाल कोथळकर व पोलीस अमलदार सुशील सुरवसे यांनी घटनास्थळी सापळा लावला.
सदर ठिकाणी पोहोचून कारची पाहणी केली असता कारमध्ये बसलेले समीर प्रकाश शेलार (वय २३) व संपत गणपत दुगे (वय ३५), दोघेही रा. निमोणे, ता. शिरूर यांना ताब्यात घेण्यात आले. कारची झडती घेतली असता हँडब्रेकखाली एक गावठी बनावटीचे पिस्तूल व त्याच्या मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल कोथळकर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 218/2026 अन्वये शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करीत असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, १४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस अमलदार नितेश थोरात व सचिन भोई हे शिरूर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना नितेश थोरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नवनाथ गोरडे हा त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून अहमदनगर–पुणे हायवेने शिरूरकडे येत असून त्याच्याकडे बेकायदेशीर गावठी पिस्तूल आहे.
ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह सतरा कमान परिसरात अहमदनगर–पुणे रोडवर सापळा लावला.
बातमीप्रमाणे दुचाकी तेथे आल्यावर ती भरधाव वेगाने पुण्याकडे निघाली. पोलिसांनी पाठलाग केला असता नाना स्पॉट डोंगराजवळ सदर मोटारसायकल एका खाजगी वाहनास धडकून पडली. त्यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेला इसम डोंगराच्या दिशेने पळून गेला, तर मोटारसायकलजवळील इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव नवनाथ साहेबराव गोरडे (वय ३८, रा. पोहेगाव खुर्द, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल व मॅगझीनमध्ये पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
तपासादरम्यान सदर पिस्तूल हे नवनाथ गोरडे याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या सागर बनसोडे (रा. राहाता, जि. अहमदनगर) याच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलीस अमलदार नितेश थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 221/2026 अन्वये शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत. आरोपी नवनाथ गोरडे याला न्यायालयात हजर केले असता त्याला १७ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिरूर पोलीस स्टेशनने अवघ्या दोन दिवसांत केलेल्या या कारवाईत दोन गावठी बनावटीची अवैध पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक फोर्ड फिगो कार व एक पल्सर मोटारसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल , अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विशाल कोथळकर, अक्षय कदम तसेच पोलीस अमलदार नितेश थोरात, सचिन भोई, सुशील सुरवसे, अंबादास थोरे, अजय पाटील, दादाराव नागरे, संदीप खेडकर, सागर बोराडे, विजय शिंदे, निखिल राऊत, रविंद्र काळे व निरज पिसाळ यांच्या पथकाने सहभाग घेतला.

